रिक्षात बसता क्षणी 22 रुपयांचे मीटर पडणार, जिल्ह्यातील 12 हजार रिक्षाचालकांना होणार फायदा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल चार वर्षांनी रिक्षाचालकांना रिक्षाभाडेवाढ गुरुवारी (दि. 8) जाहीर करण्यात आली आहे. रिक्षाचे सुरुवातीचे किमान भाडे 20 वरून 22 रुपये केले असून तेथून पुढे प्रत्येक किलोमीटरचे भाडे 17 वरून 18 रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या 1 मेपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली. जिल्ह्यातील सुमारे 12 हजार रिक्षाचालकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये रिक्षाभाडे वाढ केली होती.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरुस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा समावेश करून भाडेवाढ दिली आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी प्राधिकरणाची बैठक झाली होती. प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई, सचिव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. त्यावेळी रिक्षाचालकांनी दरवाढ देण्याबाबतची मागणी केली होती. यापूर्वी 2017 मध्ये रिक्षभाडेवाढ केली होती. त्यानंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढले. मेंटेनन्स्‌, इन्शुरन्स वाढला. यामुळे भाडेवाढ देणे आवश्‍यक होते. तसेच यापूर्वी इतर जिल्ह्यात रिक्षाभाडे वाढ दिली आहे. या सर्वांचा विचार करून भाडेवाढ दिल्याचे डॉ. अल्वारिस म्हणाले.