Delhi 2020राजकीय

केजरीवाल रविवारी ‘या’ 6 मंत्र्यांसह घेणार शपथ, राष्ट्रपतींनी केली मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – दिल्ली २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकून इतिहास घडवला असून भाजपाला अवघ्या ८ जागा जिंकता आल्या आहेत तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंदानी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अरविंद केजरीवालांच्या नावाची घोषणा केली असून त्यासोबत सहा मंत्र्यांची सुद्धा मंत्रिमंडळात नियुक्ती केली आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या शपथविधीच्या सोहळ्यात अरविंद केजरीवाल हे मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम या नेत्यांसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली साठी अरविंद केजरीवालांची नियुक्ती केल्यावर आनंद व्यक्त केला. दुसऱ्या अधिसूचनेननुसार राष्ट्रपतींनी केजरीवालांचा राजीनामा स्वीकारला आणि नवीन शपथविधी होईपर्यंत केजरीवाल हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्ष हा दिल्ली बाहेरील शहरात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी पक्षाने स्थानिक निवडणुकांत सहभागी होण्याचा निश्चय केला आहे. पक्षाच्या विस्तारासाठी येत्या रविवारी एक बैठक आयोजित केली आहे असे पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाळ राय यांनी माध्यमांना दिले.

पहिल्या टप्प्यात पंजाब प्रातांतील निवडणूक लढवण्याचा पक्षाचा विचार असून राष्ट्रीय स्तरावरून स्वयंसेवक तयार करून पक्षाचा विस्तार करणार असल्याचे केजरीवालांचे विश्वासू गोपाळ राय यांनी सांगितले. यापुढे गोपाळ राय म्हणाले की भाजपचा राष्ट्रवाद हा नकारात्मक असून आम्ही सकारात्मक राष्ट्रवादावर आपले कार्य करीत राहील. 9871010101 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन लोक आपच्या ‘राष्ट्रनिर्माण अभियान’ मध्ये सहभागी होऊ शकतील. आम्ही या अभियानाद्वारे देशभरात पोहचून आमचे कार्यकर्ते तयार करू .. आम आदमी पक्ष आता मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही निवडणूक लढविणार असल्याचे गोपाळ राय यांनी सांगितले.

Back to top button