चाकूने वार करून मोबाईल हिसकावला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – रावेतमधील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व रिसर्च समोर मोबाईल फोनवर बोलत असलेल्या तरुणावर दोघांनी वार करून मोबाईल फोन हिसकावून नेला. या प्रकरणी अनिकेत सतीश नागराळे (१८, रा. पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व रिसर्च वसतिगृह, रावेत) याने फिर्याद दिली. तर अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वसतिगृहाच्या बाहेर फोनवर बोलत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अनिकेत याच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्याचा मोबाईल फोन हिसकावून नेला. यामध्ये अनिकेत गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.