सोलापूर : मुलाने आत्महत्या केलेल्या ठिकाणीच 3 महिन्यांनी आईनेही संपविले जीवन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   तीन महिन्यापूर्वी मुलाने ज्या ठिकाणी पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी आईने आत्महत्या केल्याची हृद्यद्रावक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेश तलावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शारदा भीमराव कोळी (वय, 40, रा. जम्मावस्ती, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, 31 डिसेंबर रोजी मृत शारदाबाईच्या मुलाने गणपती घाट येथे आत्महत्या केली होती. मुलाने आत्महत्या केल्यानंतर मृत शारदाबाईचे मानसिक संतुलन बिघडले होते. आता त्याच ठिकाणी पाण्यात उडी टाकून शारदाबाईने आत्महत्या केली. गणपती घाट येथे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. चावडी पोलीस तपास करत आहेत.