सासूनेच केला जावयावर चोरीचा गुन्हा दाखल, काढली ‘वरात’

बीड: सासुरवाडीला जावयाचे सर्वच चोचले पुरवले जातात. जावयाला काय हवं नको ते सासू सासरे काळजी घेत असतात. मात्र पाहुणचार करणाऱ्या सासूनेच जावयावर चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने चोरी केल्याचे बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे राहणाऱ्या सासूने सिरसाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटल आहे.

सुनीता बंडूराव कांबळे या सिरसाळा पोलीस कॉलनी येथे राहतात. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी हेमा मागील वर्षापासून राहत आहे. तिचा पती गोपाळ उत्तम कसबे (रा. वानटाकळी) हा नेहमी त्यांच्याकडे येत असतो. गोपाळने त्याची आधारकार्ड व इतर कागदपत्रे सासूरवाडीत ठेवली होती. बुधवारी सातेफळ येथे सुनीता या कुटूंबियांसह नातेवाईकाच्यालग्नासाठी गेल्या होत्या. दरम्यान गोपाळला त्याच्या कागदपत्रांची आवश्यकता भासल्याने त्याने सासरे खंडूराव कांबळे यांना फोन केला आणि कागदपत्रे मागितली. त्यांनी घरी आल्यावर देतो असे सांगतीले. त्यावर गोपालचा पारा चढला. त्याने थेट सासऱ्याचे घरं गाठले आणि कुलुप तोडून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपत्रे आणि रोख रक्कम २० हजार रूपये चोरून नेले. कांबळे कुटूंबीय घरी परतल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर सासू सुनीता कांबळे यांनी जावयाला कायमची अद्दल शिकवण्यासाठी थेट सिरसाळा पोलीस स्टेशन गाठत जावई गोपाळ कसबेवर चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.