आईला भेटायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव पठार येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई आंबेगाव पठार येतील चिंतामणी शाळेसमोर बुधवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास करण्यात आली. आरोपी चिंतामणी शाळेसमोर आईला भेटायला आला होता. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

योगेश सर्जेराव रसाळ (वय-२२ रा. मुपो. गुजवणे ता. वेल्हा, जि. पुणे), उमेश बाजीराव रसाळ (वय-२४ रा. अष्टविनायक नगर, आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आंबेगाव पठार येथे एक महिन्यापूर्वी खूनचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी चिंतामणी शाळेसमोर आईला भेटण्यासाठी उभे असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी आणि शिवदत्त गायकवाड यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आणि वर्णनाच्या आधारे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जावू लागले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन अटक केली. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्वल मोकाशी, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने केली.