सुजय विखेंना न्यायालयाने चांगलेच फटकारले; म्हटलं – ‘अशा कामाचा हेतू कधीच शुद्ध नसतो’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने संकट कायम आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी रेमडेसिव्हिर आणल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुजय विखेंना फटकारले.

अहमनगर जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सुजय विखे-पाटील यांनी दिल्लीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणून वाटप केले होते. राज्यात तुटवडा असताना सुजय विखे यांनी केलेल्या या प्रकारामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने फटकारले. ‘तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो, अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी सुजय विखेंना खडसावले. त्यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडिओ चित्रित केला. हा ड्रामा करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. आपण मतदारसंघातील खासदार असून, दिल्लीत आपले वजन वापरून कशाप्रकारे इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा होता, तो टाळता आला असता, अशा शब्दांत फटकारले.

दरम्यान, सुजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी विमानाने जाऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा आणला होता. तो लोकांमध्ये वाटला होता, हा गुन्हा ठरू शकत नाही, असा युक्तिवाद विखेंच्या वकिलांनी केला होता.