महापालिका अधिकारी समजून भलत्यालाच दिली लाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेत कोणतेही काम करायचे असेल तर लाच द्यावी लागते हे आता सर्वसामान्यांच्या इतके अंगवळणी पडले आहे की कोणी महापालिका अधिकारी असल्याचे सांगून आला तर लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि आपले काम होण्यासाठी त्याची सरबराई करतात. त्याचाच फायदा एका ठगाने घेतला. सराफानेही त्याची सरबराई केली. त्याला पाहिजे ते दिले. तरीही काम न झाल्यानंतर चौकशी केल्यावर आपण भलत्यालाच लाच दिल्याचे त्यांना समजले.

पालिका अधिकारी समजून सराफाने ठगालाच लाखो रुपये दिल्याचा प्रकार खारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नीलेश सोनी (वय ३६) हे बांद्रा परिसरात राहण्यास आहेत. त्यांना ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर एलईडी बोर्ड लावण्याबाबत परवानगी हवी होती. त्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर पालिका अधिकारी असल्याचे भासवून ठगांनी त्यांच्याशी ओळख वाढविली. सोनी यांचा विश्वास संपादन केला. परवानगी देण्याच्या नावाखाली ४५ हजार रुपयांची मागणी केली. सोनी यांनी त्यांना ४५ हजार रुपये दिले.

पुढे अनेक दिवस झाले, तरी पालिका विभागाकडून काहीच हालचाली नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पालिका कार्यालयात विचारणा केली. मात्र, असे कोणतेही अधिकारी तेथे कार्यरत नसल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. अखेर त्यांनी याबाबत खार पोलिसांत तक्रार दिली. तपासात पालिका अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले.