संपत्तीसाठी ७ वर्षाच्या चिमुकल्याचा मामाने केला खून

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन – फलटण तालुक्यातील सपकळवाडी येथील ७ वर्षाच्या बेपत्ता चिमुकल्याचा त्याच्या मामानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ संपत्तीसाठी मामाने ७ वर्षाच्या भाच्याचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहीरीमध्ये टाकून दिला. पोलिसांनी याप्रकरणी मामाला अटक केली आहे.

कल्पेश भाऊसो सपकाळ (वय-७) असे खून करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग सदाशिव घाडगे (वय-३७ रा. सपकळवाडी ता. फलटण मुळ रा. चिंचणी ता. खटाव) याला अटक करण्यात आली आहे. तर कल्पेशची आई रंजना सपकाळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश हा ३० जानेवारी पासून बेपत्ता होता. कल्पेशच्या आईने मुलगा बपत्ता असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. आईच्या फिर्य़ादेवरुन पोलिसांनी कल्पेशचा शोध सुरु केला. त्यावेळी कल्पेश हा त्याचा मामा पांडुरंग याच्या सोबत शेवटचे पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मामा पांडुरंग याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पांडुरंग हा सराईत गुन्हेगार आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने कल्पेशला वडापाव देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. सपकाळवाडी येथील ओढ्याच्या बाजूला असलेल्या शेताजवळ त्याचा गळा दाबून खून केला. पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह विहीरीत टाकून दिला. पांडुरंग याने संपत्तीसाठी खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक बोंबले, नाळे यांनी केला.