सासरी रहायला आल्याच्या रागातून विवाहितेचा गळा आवळून खुन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आईवडिलांच्या सांगण्यावरुन पुण्यात सासरी रहायला आल्याच्या कारणावरुन विवाहितेचा गळा दाबून तिचा खुन करण्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे.
सारिका योगेश देसाई (वय २३) असे या विवाहितेचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी तिचा पती योगेश इराण्णा देसाई (वय २६, रा. साई आनंदनगर, धावडेवस्ती, भोसरी) तसेच सासरे इराण्णा देसाई, सासू विमल देसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सारिकाची आई अनिता राजकुमार बिराजदार (वय ४०, रा. शिर्पनहळ्ळी, पो़ कर्दळी, ता़ दक्षिण सोलापूर, जि़ सोलापूर) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, योगेश देसाई व त्याचे आई वडिल हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील केगावचे राहणारे आहेत. योगेश याचे सारिकाशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी ते गावी रहात होते.

नोकरीसाठी योगेश हा भोसरीला आई वडिलांसह आला. मात्र, सारिका हिला त्याने आईवडिलांकडे ठेवले होते. तिच्या आईवडिलांच्या सांगण्यावरुन ती सासरी पुण्यात रहायला आली. याचा राग मनात ठेवून योगेश याने १९ नोव्हेंबरला सायंकाळी सारिका हिचा गळा आवळून खुन केला. तिचा मृतदेह तसाच घरात ठेवून ते निघून गेले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच ते साईआनंदनगरमधील घरी गेले व त्यांनी सारिकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले.

परंतु, त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी तिची आई अनिता बिराजदार यांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बिराजदार यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे अधिक तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com