लासलगाव येथील मुस्लिम समाजाने ठेवला आदर्श, साखरपुड्यातच उरकले लग्न

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.अशावेळी गर्दी जमा होईल अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची किंवा विवाह समारंभ पुढे ढकलण्याची किंवा अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे शासनातर्फे आवाहन केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर लासलगाव येथील जेष्ठ पत्रकार हारून शेख यांची पुतणी व मुन्नवर शेख यांची मुलगी सिद्दीका तसेच नाशिक येथील रहिवाशी शेख अफजल यांचे चिरंजीव जिशान यांचा साखरपुढा मंगळवारी दुपारी लासलगाव येथे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.साखरपुढ्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर वर पक्षाकडील आजोबा हाजी अकबर शेख आणि चुलते प्रख्यात चार्टड अकाऊंट अकिल शेख यांच्या कडून विवाहाचा प्रस्ताव आला यावर वधू आणि वर पक्षातील जेष्ठ मंडळींनी सकारात्मक चर्चा केली व सध्या कोरोनाच्या साथीमुळे विवाहास गर्दी करता येणार नाही असे आलेल्या पाहुण्यांना समजावून सांगितले व त्वरित लग्न करण्याचे ठरले़.लागलीच दुपारी ४ वाजता हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने उरकण्यात आला.या कार्यक्रमासाठी आलेल्या केवळ ३० ते ३५ पाहुण्यांना जेवण या लग्नामध्ये देण्यात आले व विवाह सोहळा पार पडला.

कोरोनाने जगभरातील स्थिती बिघडवून टाकली आहे़ आपल्या विवाह सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे पाहुण्यांना त्रास नको या भावनेतून हा विवाह सोहळा उरकण्यात आला असे जेष्ठ पत्रकार हारून शेख यांनी सांगितले.यात कसलीही खरेदी नाही,बस्ता नाही, वाजंत्री,घोडे नाहीत,पाहुणे रावळे यांचा मानपान नाही. मात्र सर्वांचाच उत्साह हा जोरात होता असा अभूतपूर्व लग्न सोहळा केवळ आणि केवळ कोरोनामुळेच घडला असल्याची चर्चा शहरात होती.