‘त्या’ क्लीपमध्ये भाजप मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – शहरातील एका पोलीस कर्मचारी आणि नागरिकाशी झालेल्या संभाषणात मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख आला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लीप आपण निवडणूक आयोगाला दिली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे सीडीआर मिळावेत म्हणून मागणी केली आहे, अशी माहिती आ. अनिल गोटे यांनी धुळे येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आ. गोटे यांनी ही क्लीप पत्रकारांना ऐकवली.

धुळे मनपा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असतानाच हा आरोप झाल्याने भाजपा याला कसे प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. अनिल गोटे स्वपक्षाविरोधातच अस्त्र उगारल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

आ. अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विनोद थोरात यास अटक करण्यात आली होती. थोरात यास अटक झाली, त्यादिवशी एका पोलीस कर्मचाऱ्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याला भ्रमणध्वनीवर संभाषण झाले होते. त्यात थोरातला कोठून अटक करण्यात आली. त्याला मदत करणारे कोण होते? त्याच्याकडून पोलिसांना नेमकी काय माहिती मिळाली ? यासंदर्भात दोघांमध्ये संभाषण झाले आहे. आठ मिनिटे ५९ सेकंदांची ही क्लीप असून त्यात मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. सुभाष भामरे, हिरामण गवळी, नाना कर्पे यांच्या नावाचा संदर्भ आला आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याला मंत्र्यांनी पाठबळ दिले असल्याचा आरोप आ. गोटे यांनी या वेळी केला. या प्रकरणामुळे भाजपसमोरील अडचणी वाढत चालल्या असून धुळे महापालिकेची निवडूक भाजपसाठी सोपी राहिलेली नसल्याचे दिसून येत आहे. आ, अनिल गोटे यांना डावलल्याचा प्रयत् स्थानिक भाजप नेत्यांनी सातत्याने केल्याने आता गोटे यांनी उघडपणे भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.