सर्व वैद्यकीय शाखेच्या डॉक्टरांनी एकत्र येणे ही काळाची गरज : डॉ. सुरेश पाटणकर

धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कारांचे वितरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य उपचारांसाठी अनेक पॅथी उपलब्ध असताना त्यांच्या मध्ये दुरावा निर्माण व्हायच्या ऐवजी एकत्रितरित्या व एकमेकाला पूरक असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. रूग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एकत्रित उपचार पद्धती हाच भविष्यकाळातील मार्ग असून त्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणे ही काळाची व समाजाची गरज आहे असे मत एस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.

आरोग्यभारती व एस हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजा आणि एस हॉस्पिटल आयोजित धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आयकर विभाग अहमदाबाद झोनचे सहआयुक्त डॉ. उमेश फडे आणि आयुर्वेद ग्राम, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकुमार सरदेशमुख यांना यावेळी धन्वंतरी आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह आणि औषधी वनस्पती असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

संचेती रुग्णालयाचे संस्थापक पद्मविभुषण डॉ. कांतीलाल संचेती, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आरोग्य भारतीचे मुकेश कसबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दबडगाव हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डॉ. पाटणकर म्हणाले, आधुनिक शास्त्राबरोबरच आपले ग्रंथांमध्ये जे शास्त्र आहे. त्यांनी जे सिद्धांत मांडले आहेत त्याचाही शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार होणे आवश्यक आहे. आयुर्वेदाकडे बर्‍याचदा हीन भावनेने पहिले जाते. कुठल्याही शास्त्राची चेष्टा करू नये. त्यामुळे त्याची किंमत कमी होत नाही. या आपल्या जुन्या शास्त्रावर आधारित अधिक संशोधन होण्याची गरज आहे अन्यथा योग आणि आयुर्वेद हे परदेशातून भारतात येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आयुर्वेदामध्ये अधिक संशोधन होण्याची गरज असून त्यामुळे भारतीय वैद्यक शास्त्राला फार मोठी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले. आपण परदेशातून महागडी वैद्यकीय उपकरणे आयात करतो परंतु त्याबाबतही भारतात संशोधन करून अधिक दर्जेदार व परवडणार्‍या किंमतीत कशी करता येतील यावरही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

डॉ.संचेती म्हणाले, फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच आता संपली आहे. पूर्वी आरोग्याच्या प्रश्नांबरोबरच कुटुंबातील अनेक प्रश्न फॅमिली डॉक्टरकडे विश्वासाने सोपवले जायचे. शरीर, मन आणि आत्मा हे सर्वांनाच आहे. सर्वांचा आत्मा एकच असतो. मी एकटा करून दाखवेन हे आजकालच्या परिस्थितीत वैद्यकीय शास्त्रातही शक्य नाही. त्यामुळे सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, फॅमिली डॉक्टर या संकल्पनेतून डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये कौटुंबिक नाते तयार होते. परंतु दुर्दैवाने ही संकल्पना संपलीआहे. 21 व्या शतकात इंटरनेटच्या माहितीवरून उपचार घेणे, बायोटेक्नोलॉजी आणि तंत्रज्ञानाच्या जगात कदाचित डॉक्टरांची गरज लागेलकी नाही अशी शंका मनामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीची कृत्रिम उपचार पद्धती तयारहोणे धोकादायक असून त्याबाबत विचार करण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.

डॉ. एकबोटे म्हणाले, समाजात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. त्याचा सकारात्मकपरिणाम अगदी ज्यांनी न बदलण्याचा निर्धार केलेला असतो त्यांच्यावर होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो. तीनही पॅथीच्या डॉक्टरांना धन्वंतरी आरोग्य पुरस्काराने गौरविणे ही सकारात्मक बाब असून अशी रत्न समाजासमोर आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नक्की उपयोगी पडतील असे गौरोद्गार त्यांनी काढले.

मुकेश कसबेकर म्हणाले, धन्वंतरी देवता ही फक्त डॉक्टरांची देवता आहे असे समजलेजाते. धनत्रयोदशीला धन्वंतरीचे पूजन करणे अपेक्षित आहे. परंतु आपण धनाची पूजा करतो. धन्वंतरीचे पूजन सर्व समाजाकडून होणे आवश्यक आहे कारण ती आपली आरोग्य देवता आहे.

डॉ. अजय चंदनवाले, डॉ. उमेश फडे आणि वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आनंद बर्वे यांनी केले तर आभार डॉ. अनुपमा गोरडे यांनी मानले.

Visit : policenama.com