पुढील 10 दिवस पाऊस राहणार, मान्सून लांबण्याचे ‘हे’ आहे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षी देशात मागील २५ वर्षांपेक्षा सर्वात जास्त पाऊस पडल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसला असून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ज्यात ३७१ जणांचा मृत्यू झाला होता. आत्ता कुठे पाऊस थांबला असा दिलासा मिळाला होता. मात्र अशातच हवामान विभागाने नवीन इशारा दिला असून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये पुढच्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असे सांगितले आहे.

पाऊस उशिरा सुरु झाल्याने यावर्षीचा पावसाळ्याचा ऋतुकाळ लांबला आहे. सुरुवातीला जून महिन्यात सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस झाला होता त्यामुळे पावसाबद्दल चिंता वाढली होती मात्र याची कसर भरून काढत पुढील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या ३ महिन्यांत जोरदार पाऊस झाला, इतका की काहीठिकाणी पूरपरिस्थिती ओढवली.

मात्र सुरुवातीला मान्सून लांबल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पाऊस होऊ शकतो असेही विभागाने स्पष्ट केले आहे. वाऱ्यांच्या येण्याजाण्याची दिशा आणि वेळ बदलल्यामुळे यावर्षी मान्सूनचा पॅटर्न बदलला, त्यामुळे ज्या सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते त्याच महिन्यात जास्त पाऊस कोसळला, असं तज्ज्ञांंचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहार येथे पावसाचा सर्वाधिक परिणाम :
या मुसळधार पावसामुळे आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्याच्या शुक्रवारपासून या राज्यांत १४४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Visit : policenama.com