Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 1669 नवे रुग्ण आढळले, 40 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 23 हजार पार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना बाधितांचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून ही वाढ आता दर दिवशी हजारांच्या पुढे गेली आहे. देशभरात गेल्या २४ तासात १ हजार ६६९ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत २३ हजाराचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी सकाळी देशात एकूण २३ हजार २९ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा मृत्यु झाला असून एकूण ७२१ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे.

१८ एप्रिल रोजी देशात एकाच दिवशी सर्वाधिक २ हजार १३ नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर गेल्या २४ तासात सर्वाधिक १ हजार ६६९ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.

देशभरात नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्याचवेळी कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासात ६४२ जण पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत ५ हजार १२ जण कोरोना विषाणुतून बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ६ हजार ४३० पर्यंत पोहचली आहे. त्यात मुंबई सर्वाधिक ४ हजार २०५ जण कोरोना बाधित झाले आहेत.