जगात सर्वांत वयोवृद्ध असणाऱ्या ‘या’ व्यक्तीचे निधन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच जपानच्या चितेस्तू वातानाबे यांची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली होती, त्यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळेस त्यांचे वय ११२ वर्ष होते. वातानाबे यांना १२ फेब्रुवारीला ‘गिनीज’चे प्रमाणपत्र देण्यात आले. ते स्वीकारताना त्यांनी सांगितले की, आपले हास्य हेच आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. दरम्यान वातानाबे यांना अलिकडे त्यांना ताप येऊ लागला होता आणि श्वासोच्छवासातही त्रास होऊ लागला होता. त्यांना व्यवस्थितपणे खाता देखील येत नव्हते. शेवटी त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

वातानाबे यांचा जन्म १९०७ मध्ये झाला असून त्यांनी तैवानमध्ये १८ वर्षे नोकरी केली होती. नंतर त्यांनी त्यांच्या निवृत्तीपर्यंत सरकारी नोकरी केली. तसेच वातानाबे यांना शेतीची खास आवड होती. आपल्या शेतात ते फळे आणि भाज्यांची शेती करीत असत. वातानाबे यांच्या पश्चात त्यांना ५ मुले, १२ नातवंडे, पतवंडे आणि एक खापरपणतू असा भलामोठा परिवार आहे. दरम्यान, जसे पुरुषांमध्ये वातानाबे हे जगातील सर्वांत वयोवृद्ध पुरुष होते तसेच महिलांमध्ये देखील सर्वात वयोवृद्ध महिला ही जपानी नागरिक आहे. या महिलेचे नाव केन तनाका असे असून त्या तब्बल ११७ वर्षांच्या आहेत.