आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून विक्रेत्यावर चाकूने सपासप वार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आईस्क्रिमचे बिल मागितल्याच्या रागातून टोळक्याने आईस्क्रिम विक्रेत्यावर चाकूने भोकसून सपासप वार केल्याची घटना सोमवारी (दि.४) मध्यरात्री देवकर पाणंद येथे घडली. आईस्क्रिम विक्रेत्यावर वार केल्यानंतर टोळक्याने त्याच्या गाडीची ही तोडफोड केली. या घटनेत जखमी झालेल्या धिरज शिवाजी शिंदे (वय-२८ रा. संतोष कॉलनी, पाणंद) याला सीपीआरमध्ये उपचासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी दहा ते बारा जणांवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने धिरलवर वार करुन त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोकड चोरुन नेली. या प्रकरामुळे सानेगुरुजी वसाहत परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. धीरज शिंदे याची देवकरण पाणंद येथे आईस्क्रिमची गाडी आहे. त्यावर बिहारी कामगार ठेवले आहेत. देवकर पाणंद येथील गुंड प्रवृत्तीची मुले या गाडीवर रोज येवून फुक्क़ट आईस्क्रिम खातात

नेहमीप्रमाणे तो सोमवारी साडेदहाच्या सुमारास आला. त्याचेसोबत आणखी नऊ साथीदार होते. या सर्वांनी दहा आईस्क्रिम घेतली. त्याचे बिल तीनशे रुपये झाले. कामगाराने बिल मागितलेनंतर टोळक्याने बिल मागतो काय, इलाका माझा आहे. बिल देत नाही, गाडी चालावायची आहे तर आईस्क्रिम फुकट दिले पाहिजे असा दम दिला. बिथरलेल्या कामगाराने धीरज शिंदे याला फोन करुन बोलवून घेतले. शिंदे याने एक आईस्क्रिम फुकट ठिक आहे, दहा देणे शक्य नाही असे म्हटल्यावर संशयित थांब तुला आता सोडत नाही, असे म्हणून निघून गेले.

मध्यरात्री गाडी बंद करुन घरी जात असताना संशयित चाकु, बांबु, दगड घेवून आले. आम्हाला दमदाटी करतोस काय, म्हणून आईस्क्रिमच्या गाडीची तोडफोड करुन धीरजवर चाकुने हल्ला केला. याप्रकाराने देवकर पाणंद परिसरात गोंधळ उडाला. कामगारांनी जखमी धीरजला सीपीआरमध्ये दाखल केले. या टोळक्याने चार दिवसापूर्वी फुक्कट आईस्क्रिम दिले नाही म्हणून धीरज शिंदे याचेशी वादावादी केली होती. आईस्क्रिम फुकट दिले नाही तर परिसरात धंदा करायचा नाही, अशी धमकी या टोळीने दिली होती. परिसरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला होता. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत.