मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापुरात एका तरुणाचा मोटारीने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. तो विक्रमनगर येथे पेंटर म्हणून काम करीत होता. रमजान राजू इनामदार (वय 21, रा. सिद्धेश्‍वर शाळेजवळ) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना उचगाव बायपासवर महामार्गावर सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान महिन्यापूर्वीच या तरुणाच्या वडिलांचे निधन झाले होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गांधीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. उचगाव येथील पेंटिंगचे काम आटोपून रमजान घराकडे येत होता. त्याचवेळी सांगली फाट्याकडे येणार्‍या भरधाव मोटारीची जोरात धडक त्याला बसली. त्यामुळे रमजान रस्त्यावर फेकला गेला.

गंभीर जखमी झालेल्या रमजानला चालकाने त्याच मोटारीतून शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. रमजानच्या वडिलांचा महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. पतीच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत मुलाचा मृत्यू झाल्याने आई आयेशा, बहीण निलोफरसह नातेवाईकांना मानसिक धक्‍का बसला.

Loading...
You might also like