सुनेच्या घरी जाताना काळाची झडप ! ट्रक आणि कारच्या धडकेत मुलासह आई-वडिल जागीच ठार !

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – आजारी नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या आईवडिल आणि मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर चांडस नजीक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला ज्यात आईवडिल आणि मुलगा जागीच ठार झाले. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

किसन कड (वय 71), जिजाबाई कड (वय 62), मुलगा अमोल कड (वय 30) वाशिम येथील रहिवाशी आहेत. हे तिघेही डोणगाव येथे आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने जात होते. हे आजारी नातेवाईक मुलगा अमोलच्या पत्नीच्या माहेरचे नातेवाईक आहेत. याचवेळी ते कारने चांडसजवळ पोहोचले असता अचानक एका भरधाव ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली. यात आईवडिल आणि मुलगा जागीच ठार झाले आहेत. हा अपघात खूप भीषण होता. यात त्यांची कार चक्काचूर झाली. अपघात झाल्यानंतर चांडस येथील ग्रामस्थांनी ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली. परंतु ते तिघेही जागीच ठार झाले होते.

अमोल कड व्यवसायानं वकिल होता. त्याचे वडिल हे सेवा निवृत्त बँक अधिकारी होते. अमोलची पत्नी आणि लहान मुलगा आधीच डोणगावला पोहोचले होते. एकाच कुटुंबातील तिघांच्या जाण्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हा अपघात झाल्यानंतर शिरपूरचे पोलीस उपनिरीक्षक शरद साठे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रस्त्यावरील वाहने हटवली गेली. दरम्यान ट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.