शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येथोचित मार्गाला लावणार : तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ सुरोशे

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघप्रणित शिवाजीराव पाटील संघटना मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन मुरबाड राजयोग सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष भागवत पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत, ज्येष्ठ सल्लागार जयवंत मुरबाडे, जिल्हा सरचिटणीस वसंत पडवळ, दिव्यांग संघटना राज्य सचिव काशिनाथ राऊत यांसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करून विषय सोडविण्यासाठी अधिवेशनात ठराव घेण्यात आले.
या वेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, पालघर विकल्प विपरीत शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडणे. मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये. शिक्षकांची पगार उशिरा करण्यास जबाबदार असणाऱ्यावर शासन आदेशानुसार कारवाई करण्याची मागणी करणे. ऑनलाइन शिक्षणातील अडचणी व उपाययोजनावर ठराव घेण्यात आले.

अधिवेशनाचे अध्यक्ष भागवत पवार, जिल्हा कार्यकारिणी यांच्या सहमतीने मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी साेमनाथ सुराेशे यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्ष रवींद्र मोहपे यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सोमनाथ सुरोशे यांनी संघटनेवर असलेली निष्ठा व आतापर्यंत निःस्वार्थीपणे केलेले शिक्षक संघाचे काम याची पोचपावती म्हणून संघटनेने माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा देऊन जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून भविष्यकाळात तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येथोचित मार्गाला लावून संघटना वाढीस तसेच शिक्षकांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करून संघटनेचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर पोहाेचविण्याचा विश्वास व्यक्त केला.

संघटनेच्या नवनिर्वाचित सर्व कार्यकारिणींनी यापुढील काळात तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वजण एकजुटीने एकत्र येऊन परस्पर सामंजस्य व सहकार्य या भावनेतून काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त शिक्षक बंधू-भगिनींचे योगदान मिळवून संघटनेचा विस्तार करण्यात येईल, असे कार्याध्यक्ष रवींद्र मोहपे यांनी सांगितले, तर सूत्रसंचालन सोपान गोल्हे यांनी केले.