Coronavirus : घरी सिलेंडर येईल त्यावेळी डिलिव्हरी बॉय ‘या’ 4 गोष्टी सांगेल, ‘लक्षपुर्वक’ ऐकण्यास पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोनाविरूद्धच्या मोहिमेतील डिलिव्हरी बॉयची महत्त्वपूर्ण भूमिका विशद केली आहे. देशातील एक हजाराहून अधिक LPG विक्रेत्यांशी बोलताना त्यांनी या लढाईतील डिलिव्हरी बॉयला पहिल्या रांगेतील योद्धा म्हणून संबोधले आहे आणि जनतेला जागृतीशी संबंधित चार गोष्टी सांगण्याचे आवाहन केले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एलपीजी वितरकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेंतर्गत 3 मोफत सिलिंडर देण्याची सूचना केली.

धर्मेंद्र प्रधान यांनी एलपीजी सिलिंडर स्वच्छ करण्याचे तसेच डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी वितरकांना ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सुरक्षेसंदर्भात चार महत्वाच्या गोष्टी सांगण्यास सांगितले आहे.

1. कोरोनापासून बचाव करण्यासाठी फेस मास्क लावा.

2. कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहितीसाठी आरोग्य सेतु ऍप वापरा.

3. हातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

4. सर्वात महत्वाचे कोरोना पराभूत करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे अनुसरण करा.

म्हणजेच, आता एलपीजी सिलेंडर घेऊन आलेला डिलिव्हरी बॉय तुम्हाला कोरोनापासून वाचवण्याच्या उपाययोजनांविषयीही सांगेल. तसेही , लॉकडाऊन दरम्यान घरात राहून देशातील प्रत्येकजण नियमांचे पालन करीतच आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, डिलीव्हरी बॉय हा पहिल्या रांगेतला योद्धा आहेत . ते ग्राहकांमध्ये कोरोनाशी संबंधित आवश्यक माहिती पोहोचविण्यात प्रभावी सिद्ध होऊ शकतात . त्यांनी वितरकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात सोशल डिस्टंसिंग , स्वच्छता आणि साफसफाईकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.