आता मोबाईल चार्ज करा खिशात ठेऊन !

लंडन : वृत्तसंस्था – बाजारात अनेक नवीन -नवीन टेक्नोलॉजीचे मोबाईल फोन येत असतात आणि त्या मोबाईलच्या खासियतमुळे ते  बाजारात कधी येणार याची मोबाईल प्रेमींना उत्सुकता लागून राहते. कधी- कधी तर बऱ्याच जणांकडून या मोबाईल फोनसाठी प्री-ऑर्डर दिली जाते. खरेदी केलेल्या मोबाईल फोनमुळे आपण खुश तर होतो पण मोबाईलचे चार्जिंग काही आपल्याकडून होत नाही. अनेकदा मोबाईल फोनचे चार्जिंग ही आपल्यासाठी एक कटकट होऊन बसते.

या समस्येवर उपाय म्हणून, नॉटिंघम ट्रसेंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक असे सोलर पॅनेल बनवले आहे जे शर्टाच्या खिशालाही लावता येते. त्याच्या सहाय्याने खिशात ठेवलेला मोबाईल फोन चार्ज होऊ शकेल. आता चक्‍क कपड्यांपासूनच मोबाईल फोन आणि टॅबलेट चार्ज होऊ शकतील यामुळे मोबाईल चार्जिंगची समस्या ही दूर होणार आहे.

या उपकरणाचे नाव आहे  ‘चार्जिंग डॉक’

या उपकरणाला ‘चार्जिंग डॉक’ असे नाव देण्यात आले आहे. एक फोनला चार्ज करण्यासाठी २००० पॅनेलची गरज असते. या संपूर्ण पॅनेलचा आकार ३ मिलीमीटर लांब आणि १.५ मिलीमीटर रूंद आहे. सोलर पॅनेलच्या या तंत्राने कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते. पोषाखाचा खिसा एखाद्या पॉवर बँकसारखेच काम करू शकेल. तिथे कोणत्याही सॉकेटची गरज भासणार नाही. सोलर पॅनेलने चार्जिंग होत असताना त्याची जाणीवही मनुष्याला होणार नाही. खिशाला लावण्यात येणार्‍या चिपला रेजिनने आच्छादित केलेले असते. त्यामुळे कपडे धुताना त्यावर पाण्याचा परिणाम होणार नाही. हे कपडे अन्य सर्वसाधारण कपड्यांप्रमाणेच आपण परिधान करू शकतो. खिशात लावलेले २ हजार सोलर सेल्स कोणत्याही स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी पुरेसे आहेत. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख तिलक डियास यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक पॉवरसाठी ई-टेक्स्टाईल एक गरज आहे. यावर आतापर्यंत अधिक काम झालेले नाही; पण आता नवी दालने खुली होत आहेत.