राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अति उत्साह, महापुरुषाचा फोटोच बदलला

राजेश विटेकर यांनी लावला मल्हारराव होळकरांऐवजी यशवंतराव होळकरांचा फोटो

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश विटेकर यांनी मोठ्या उत्साहात मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती दिनी सोशल मीडियावर आभिवादन करणारे पोस्टर पोस्ट केले. मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या त्या पोस्टरमध्ये घोड चूक पाहायला मिळाली आहे. मल्हारराव होळकर ऐवजी चक्क यशवंतराव होळकर यांचा फोटो त्या पोस्टर वर लावण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा उमदेवारांची यादी जाहीर केली. या यादीत परभणी लोकसभा मतदार संघातून राजेश विटेकर यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, आज मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. त्यामुळे त्यांना आभिवादन करण्यासाठी राजेश विटेकर यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांना आभिवादन करणारे पोस्टर पोस्ट केले. मात्र त्या पोस्टरवर मल्हारराव होळकर यांच्या ऐवजी चक्क यशवंतराव होळकर यांचा फोटो लावण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, राजेश विटेकर यांच्या चुकीमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर, ज्यांना महापुरुषांचा इतिहास माहित नाही, ज्यांना महापुरुषांचे फोटो माहित नाही, त्यांना त्यांचे काय विचार माहित असणार, ते आमचा आणि समाजाचा काय विकास करणार. त्यांची ही पोस्ट केवळ धनगर समाजाची मते घेण्यासाठी आहेत. असा आरोपही धनगर समाजाच्या जनते कडून करण्यात येत आहे.