चंद्रावर उगवलेल्या ‘त्या’ रोपाने मान टाकली

बीजिंग : वृत्तसंस्था – कालच (17 जानेवारी) चांद्रभूमीवर कापसाचे बीज अंकुरीत करण्यात संशोधकांना यश आल्याचे वृत्त समोर आले होते. चीनने चंद्रावर पाठवलेल्या ‘चांगी – 4’ या यानात कपाशीच्या बीजापासून उगवलेले रोप जगभरातील संशोधक व सामान्य लोकांच्याही कुतुहलाचा विषय बनले होते. परंतु आता रोप उगवल्याच्या दुसऱ्या दिवशीच येथील तापमानामुळे या रोपाने मान टाकल्याचे समोर आले आहे. तेथे असणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे हे घडल्याचे समजत आहे. रात्री तेथे उणे 170 अंश सेल्सिअस इतके थंड तापमान असते. यामुळे हे रोप तेथे तग धरू शकले नाही.

या घटनेनंतर संशोधक शाई गेंगशिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोप जास्त काळ जगणार नाही याची आम्हालाही कल्पना होती, असे त्यांनी म्हटले आहे. ‘चांगी – 4’ हे यान 3 जानेवारीला चंद्रावर उतरले होते. ‘डार्क साईड’ किंवा ‘फार साईड’ असे म्हटले जाणार्‍या चंद्राच्या विरुद्ध बाजूवर हे यान उतरले आहे. या यानाबरोबर संशोधकांनी पाणी आणि मातीने भरलेला एक डबाही पाठवला होता. 18 सेंटीमीटरच्या या डब्यात कापूस, बटाटे आणि मोहरीची बीजे आहेत. तसेच यानातून फ्रूट फ्लायची (माशी) अंडी आणि कवकही पाठवले आहेत.

यातील कापसाचे बीज अंकरून रोप तयार झाले होते. चंद्राच्या या बाजूवर दिवसाच्या वेळी ते 120 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. दिवसा व रात्री या चंद्राच्या या बाजूवर तापमान अतिशय विषम असते. रात्रीच्या वेळी हे तापामान घटते असते. मुख्य म्हणजे चंद्रावर एक रात्र दोन आठवड्यांची असते. याच घटत्या तापमानात हे रोप तग धरू शकले नाही.

‘चांगी-4’ या यानातून पाठवण्यात आलेल्या मोहरीची बीजे, माशीची अंडीही या सर्वांत फक्त नवे सृजन या कपाशीनेच दाखवले होते. याच्यासोबतच दोन छोटे कॅमेरे आणि हिट कंट्रोल सिस्टीमही होती. या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने त्यांची छायाचित्रे टिपली जात होती.