स्मार्ट वाॅच घालून खेळणाऱ्या पाकिस्तानच्या ‘त्या’दोन खेळाडूंना आयसीसीकडून समज

लॉर्ड्स: स्मार्ट वाॅच घालून खेळणाऱ्या दोन पाकिस्तानी खेळाडूंना आयसीसीकडून समज देण्यात आली आहे. यामध्ये असद शफीक आणि बाबर आझम या दोन खेळाडूंचा समावेश आहे.

लॉर्ड्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी पाकिस्तानचे असद शफीक आणि बाबर आझम हे खेळाडू अॅपल स्मार्ट वॉच घालून मैदानात उतरले होते. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. स्मार्ट वॉचला फोननं कनेक्ट करता येतं. तसेच मोबाईलमधील सर्व हाय-टेक सुविधा या घड्याळ्यांत असतात. त्यामुळे या माध्यमातून मॅच फिक्सिंग केलं जाऊ शकतं, अशी भीती आयसीसीला आहे.

स्मार्ट वॉच घालून खेळणाऱ्या दोन्ही खेळाडूंच्या मैदानातील हालचाली संशयास्पद नसल्याचे दिसून आले. स्मार्ट वॉच वापरणाऱ्या खेळाडूंना समज देण्याच्या वृत्ताला वेगवान गोलंदाज हसन अली याने दुजोरा दिला. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मैदानात स्मार्ट वॉच न घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता आमच्या संघातील कोणताही खेळाडू स्मार्ट वॉच घालून मैदानात उतरणार नाही, असे अली याने सांगितलं.