पुण्यात विना चालक धावली बस… नागरिकांचा उडाला थरकाप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात सर्वच मार्गावर बस बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. बस चालकाकडून आणि वाहकाकडून प्रवाशांना अर्वाच्च्य भाषेत बोलण्यामुळे वादाचे प्रसंग देखील घडले आहे. अशा अनेक कारणांमुळे पुण्यातील बस सेवा चर्चेत असतानाच आज (मंगळवार) कात्रज चौकातील बस थांब्यावर थांबलेली बस विना चालक रस्त्यावर धावली. वाहक नसताना बस धावल्याने मात्र नागरिकांचा थरकाप उडाला. या प्रकरणात दोषी असलेल्या चालकाली तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

कात्रज चौकातील बस थांब्यावर थांबलेली बस उतारामुळे पुढे जात अचानक सुरु झाली. त्यावेळी गाडीमध्ये चालक नसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ही बस पुढे जाऊन एका इंडीका गाडीला जाऊन धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पिएमपी प्रशासनाने बस चालक दिगंबर खोत याला तात्काळ निलंबीत केले.

खोत याने शिवाजीनगरवरुन एक फेरी पूर्ण करुन कात्रज स्थानकात आले. त्यांना पुन्हा शिवाजनगर कडे जायचे असल्याने त्यांनी बस बसथांब्यावरच लावली. दुपारी साडेबाराला जायचे असल्याने आणि जेवणाची वेळ झाल्याने खोत याने बस बंद न करताच जेवण करण्यासाठी निघून गेला. काही वेळापूर्वीच बस या ठिकाणी आल्यामुळे यामध्ये प्रवासी नव्हते.

बस सुरू असल्यामुळे उताराने पुढे जावू लागली. त्याचवेळी स्वारगेटकडे जाणारा सिग्नल सुटला. स्वारगेटसह बाह्यवळण मार्गाने नवले उड्डाणपुलाच्या दिशेने वाहने जावू लागली. उताराने येणारी बस एका इंडिका गाडीला धडकून थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेने कात्रजच्या चौकात एकच गोंधळ उडाला. वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. भेदरलेला इंडिका चालक गणेश माळी सुदैवाने बचावला. हिंजवडीकडे निघालेला गणेश सिग्नल मिळाल्यामुळे वळला आणि बस येवून आदळली. दरम्यान कात्रज आगार प्रमुख सतीश चव्हाण यांनी माहिती घेवून चालक खोत याला बेजबाबदारपणे बस सुरू ठेवून गेल्याबद्दल तत्काळ निलंबित केले.