पीएमआरडीएची पाहिले वाघोली क्षेत्रीय कार्यालय सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए)च्या हद्दीत नियोजनबद्ध विकासासाठी शनिवारी  दि. २७ ऑक्टोबर रोजी अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते वाघोली येथील पाहिले क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास मा. पालकमंत्री गिरीष बापट, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, भाजप तालुका अध्यक्ष रोहिदास उंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, पीएमारडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण देवरे, अधीक्षक अभियंता मिलिंद बोगाळे, कार्यकारी  अभियंता भरत कुमार बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले की,’ पीएमारडीए च्या माध्यमातून नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने  हे कार्यालय आहे. नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. सर्व कामकाजाच्या नोंदी रोज घेतल्या जाव्यात अशा सूचना ही त्यांनी दिल्या.
पीएमारडीए हद्दीत नऊ तालुक्यांचा समावेश असलेल्या भागांत लवकरच  अजून तीन कार्यालये सुरू करण्याचा महानगर आयुक्त किरण गित्ते यांचा मानस आहे. हवेली आणि शिरूर तालुक्यासाठी बांधकाम परवानगी व झोन दाखला यासारख्या अनेक कामकाजासाठी पीएमारडीएच्या औंध कार्यालयात जावे लागणार नाही.  नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने वाघोली येथील प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे.  यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयात नकाशे लावण्यात आले आहेत.