‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाला अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट जात दाखल्याच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक करुन पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी मिळवणाऱ्या पोलीस निरीक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. किरण राजेंद्र सोलगे (वय-२५ रा. मधुबन सोसायटी, सोलगे मळा, इचलकरंजी) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोलगे याला पहाटे अटक करण्यात आली आहे.

२०१६-१७ मध्ये झालेल्या परिक्षेत त्याने बनावट दाखला सादर केला होता. सोलगे याने मूळ जात इतर प्रवर्गातील असताना त्याने अनुसूचित जाती-जमातीचा बनावट दाखला जोडला होता. बनावट दाखला जोडून त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.

सोलगे याने पोलीस उपनिरीक्षक आणि मोटार वाहन निरीक्षक पदासाठी अर्ज केला होता. लेखी परिक्षेनंतर घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी परिक्षेत त्याने डमी व्यक्ती उभा केला होता. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्याची निवड झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध निनावी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आली होती. त्यानंतर सोलगे याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. बनावट दाखल्याच्या आधारे त्याने अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे कागदपत्रे दाखल करून, जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचेही उघडकीस आले. सवलतीचा फायदा घेत, सोलगे हा पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरला.

त्याला शनिवारी इचलकरंजी येथून ताब्यात घेण्यात आले. कसबा बावडा येथील न्यायालयात त्याला दुपारी हजर करण्यात आले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.