महाराष्ट्रातल्या ‘या’ शहरात स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्सवर बंदीची शक्यता 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – घरपोच अन्नपदार्थ पाठवणारे अँप म्हणून स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्स यांचा सर्रास वापर केला जातो. मात्र महाराष्ट्रातल्या नाशिक शहरात लवकरच यावर बंदी येण्याची शक्यता आहे. तेथील अन्न आणि औषध प्रशासनाने या कंपन्यांना नोटीस बजावली असून ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार या कंपन्यांच्या डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कुठलेही प्रमाणपत्र नसल्यामुळे ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

केवळ नाशिक शहरापुरता विचार करता येथे स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्स या कंपन्यांचे जवळपास साडेतीन हजार डिलिव्हरी बॉईज काम करत आहेत. मात्र त्यांच्याकडे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नाही.

सुरक्षेबाबत साशंकता

डिलिव्हरी बॉईज अन्न सुरक्षितरित्या पोहोचवतात का ? याबाबत साशंकता आहे. तो निरोगी आहे का ? त्याचे वाहन कसे आहे ? त्याने वैद्यकीय तपासणी केली आहे का? हे सर्व पडताळून बघण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित कंपन्यांची असून अन्न औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत या कुठल्याही बाबींची पूर्तता केली जात नसल्याचं निदर्शनास आले आहे.

डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम

त्यामुळे उबर इट्स, झोमॅटो आणि स्विगी या तिन्ही कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 7 दिवसात त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता पडल्यास त्यांची मान्यता देखील रद्द केली जाणार असल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कंपन्यांवर बंदी आल्यास या सर्व डिलिव्हरी बॉईजवर उपासमारीची वेळ येणार आहे.