विधानसभा 2019 : राज्यात घटनात्मक ‘पेच’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज होणारे प्रयत्न तडीस गेले नाहीत तर, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. जर सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे त्याच्या आत नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची आवश्यकता आहे. जर तसे झाले नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे.

निवडणुका होऊन निकाल लागल्यावर पूर्वीचा मुख्यमंत्री राजीनामा देतो, तेव्हा राज्यपाल हे नवीन मुख्यमंत्री शपथ घेईल तोपर्यंत तुम्ही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहाण्यास सांगतात. पण, ९ नोव्हेंबरनंतर फडणवीस यांची तीही मुदत संपून जाणार आहे. जर त्याआधी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा दावा केला तरी त्यांना शपथ घेण्यापूर्वी राजीनामा द्यावा लागतो.

भाजपाने ५ किंवा ६ नोव्हेंबरला शपथविधी घेणार असल्याचे बोलले जात होते. पण, गेल्या दोन दिवसांपासून त्याविषयी कोणीच काही बोलत नाही. सर्व पक्षाचे नेते अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुंबई सोडून गावाकडे परतले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेची चर्चा दोन तीन नेत्यांपुरती सिमित झाली आहे.

त्यामुळे जर आजच्या घडामोडीत भाजपा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याविषयी तोडगा निघाला नाही तर, राज्यात पुढील ५ दिवसात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Visit : Policenama.com