Mumbai : सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता ! गर्दीशी संपर्क येणार्‍या 150 जणांना ‘कोरोनाची’ लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. त्यातच बसमधून प्रवासी भरभरुन जात होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत केली आहे. त्यात 150 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून यात विक्रेते, व्यावसायिक, बस चालक – वाहक यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढू शकतो.

या मोहिमेअंतर्गत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांची चाचणी केली असता त्यात आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. टेस्टिंगच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी असली तरी या 150 जणांचा संपर्क एक, दोन पेक्षा जास्त लोकांशी सातत्याने आलेला आहे, म्हणजेच गर्दीशी आलेला आहे. त्यामुळे चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळी पावले उचलत या 150 जणांना आयसोलेट केले आहे. त्यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अॅडमिटही केले आहे. सोबतच या 150 जणांच्या कुटुंबाचीही चाचणीही केली आहे. मात्र गर्दीशी संपर्क येणाऱ्यांची कोरोना टेस्टिंग करणे आणि ती पॉझिटिव्ह येणे ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढू शकतो.

सुपर स्प्रेडर म्हणजे कोण ?
किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, फूटपाथवर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, विविध घरगुती सेवा पुरवणारे कर्मचारी, वाहतूक व्यवसायातील माल वाहतूक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम आदी कामे करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरवणारे शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड आदीचा समावेश होतो.