PM नरेंद्र मोदींच्या SPG सुरक्षेचे बजेट 540 वरुन 600 कोटी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) साठीचे बजेट वाढविण्यात आले आहे. एसपीजीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. एसपीजीसाठी गेल्या वर्षी ५४० कोटी रुपयांची तरतुद होती. ती आता ६०० कोटी रुपये करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये एसपीजीसाठी ४२० कोटींची तरतुद होती. ती २०१९ मध्ये ५४० कोटी रुपये करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा हटविण्यात आली आहे. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची गेल्या ऑगस्टमध्ये एसपीजी सुरक्षा परत घेण्यात येऊन त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये त्यांच्या अंगरक्षकानेच हत्या केली होती. त्यानंतर अत्याधुनिक हत्यारांनी युक्त अशा एसपीजी ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण गांधी परिवाराला एसपीजी सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.