उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

बनोटी (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील एका उमेदवाराचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव पोलीस ठाण्यातील योगेश झाल्टे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी झाल्टे याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करून चौकशी सुरू केली आहे. योगेश झाल्टे याने उमेदवाराचा सोशल मीडियावर प्रचार केल्याचे उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर ही कारवाई केली.

योगेश झाल्टे यांची नेमणूक बनोटी पोलीस चौकीवर पोलीस नाईक म्हणून आहे. ते गेल्या आठ दिवसांपासून व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश पाठवून परिचयाच्या लोकांना याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत होते. झाल्टे याने पाठवलेले मेसेज हे कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराच्या प्रचाराशी निगडीत आहेत.

हा प्रकार सोयगाव तालुका शिवसेना प्रमुख दिलीप मचे यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच ही माहिती निवडणूक विभागाला दिली. निवडणूक विभागाच्या चौकशीत सत्यता आढळल्याने दिलीप मचे यांनी निवडणूक विभागासह सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी झाल्टे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईचा अहवाल औरंगाबाद व जालना येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना सादर करण्यात आला आहे.