खंडणी मागणाऱ्या चार माहिती कार्यकर्त्यांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून खंडणी उकळल्याप्रकरणी ठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांच्यासह तिघांना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. राज्यातील भाजप सरकारने माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यर्त्यांविरोधात मोहिम उघडली आहे. यासाठी नवीन नियम करण्यात आले असून तसा शासन आदेशही काढण्यात आला आहे. त्यानुसार ठाण्यातील आजी, माजी नगरसेवकांसह २३ वादग्रस्त कार्यकत्र्यांची यादी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती महापालिकेने ठाणे पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर ठाणे शहरातील विकासक, कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा कार्यकर्त्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. हिरानंदानी बिल्डर्स अनधिकृत बांधकाम करीत असून, त्याविरोधात कायदेशीर कारवाईची धमकी देत सुधीर बर्गे याने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न मिळाल्याने तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली आणि नंतर पाच लाख रुपयांची खंडणी वसूल केली, अशी तक्रार दाखल झाली होती. तर, शौकत मुलानी आणि अरिफ ईराकी यांनी बिटकॉन या कंपनीच्या विरोधात आरटीआय अर्ज दाखल करून तक्रार मागे घेण्यासाठी तीन लाख रूपयांची खंडणी वसूल केली व दोन लाख रूपये न दिल्याने कंपनीविरोधात तक्रार केली होती.

या चारजणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार करणारे तक्रारी करत असून त्यानुसार माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू करण्यात आल्याने प्रामाणिकपणे माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.