‘यांना’ आता फक्त १०० रुपयात गॅस कनेक्शन !

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत ‘धुरमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ही संकल्पना १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यामध्ये एचपी, बीपी, आयओसी या कंपन्याच्या ७८ एजन्सी आहेत. तर ६ लाख ४७ हजार ८६५ गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून १ लाख ३ हजार ७८१ तर रेग्यूलर ५ लाख ४३ हजार ८६५ इतके कनेक्शन आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये केरोसिन पात्र शिधापत्रिकाधारकांना एकूण २६४ लीटर केरोसिनचा पुरवठा केला जात आहे.

लागणारी कागदपत्रे
राबवण्यात येत असलेल्या धुरमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेनुसार ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील महिलेने पंतप्रधान उज्ज्वला योजना विस्तारीत दोन मधून केवायसी फॉर्ममध्ये १४ निकषांवर आधारीत हमीपत्र द्यायचे आहे. हमीपत्रासोबत रेशनकार्ड झेरॉक्स, रेशन कार्डमध्ये ज्या व्यक्तींचे नाव आहे त्या व्यक्तींचे आधारकार्ड झेरॉक्सच्या दोन प्रती, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स जवळच्या गॅस एजन्सीकडे किंवी केरोसीन दुकानदाराकडे जमा करायचे आहेत.

या ठिकाणी उपलब्ध असेल हमीपत्र
कुटुंबातील महिलेने हमीपत्रासोबत दिलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. छाननी केल्यानंतर त्या कुटुंबाला १०० रुपयांत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. केवायसी आणि हमीपत्र सर्व गॅस एजन्सी आणि केरोसीन दुकानदारांकडे उपलब्ध असणार आहेत. जे केरोसिन घेत असणारे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांच्याकडे यापूर्वीच गॅस कनेक्शन आहे असे समजले जाणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

You might also like