केंद्रीय मंत्रिमंडळाची सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत एनडीएला अधिक मताधिक्याने बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पुढील हालचालींना वेग आलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

केद्रीय मंत्रिमंडळाने सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केल्याने आता राष्ट्रपती कोणत्याही क्षणी लोकसभा बरखास्त करू शकतात. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी संपत आहे. त्यामुळे ३ जूनच्या आधी सतरावी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्या प्रक्रियेलाही आता गती मिळणार आहे. तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यानंतरच सतराव्या लोकसभा स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.