बार्शीचा मराठवाड्यात समावेशाचा ठराव मंजूर 

बार्शी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेले बार्शी शहर व्यापारी शहर म्हणून इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे. याच बार्शीचा समावेश आता उस्मानाबाद जिल्ह्यात करावा असा ठराव बार्शी नगरपरिषदेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव सत्ताधारी भाजपच्या वतीने मांडण्यात आला होता. या ठरावावर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने हा ठराव बहुमताने आणि शांततेत मंजूर झाला.

राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी मात्र विषयावर जनमत घेण्यात यावे अशी मागणी केली. बार्शी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके स्मारक सभागृहात घेण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष अ‍ॅड.असिफ तांबोळी हे होते. तर विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी बार्शी तालुक्याचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्याच्या मागणीवर जनमत घेण्यात यावे अशी मागणी केली. लोकांच्या समोर हा प्रश्न मतदानासाठी ठेवून मगच बार्शीचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करायचा का यावर निर्णय घेण्यात यावा असे अक्कलकोटे म्हणाले. भाजप नगरसेवक कय्यूम पटेल व विजय चव्हाण यांनी महाराष्ट्र नगपरिषद अधिनियम १९८५ चे कलम ८१ (४) अन्वये नगराध्यक्षांकडे  या विषयाच्याअनुषंगाने प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेपुढे मतांसाठी ठेवला आणि तो प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

वास्तविक पाहता बार्शी तालुक्याच्या लोकांमध्ये बार्शीचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्याची कसली ही मागणी नाही. परंतु उस्मानाबाद जिल्हयात बार्शीचा समावेश करण्याचा फक्त राजकीय डाव आहे अशी चर्चा काल बार्शीच्या चौका चौकात रंगली होती. याविषयावर जर जनमत घेतले तर बार्शीची जनता हा विषय बहुमताने फेटाळून लावेल कारण सोलापूर सारख्या सधन जिल्ह्यातून निघून अन्य जिल्ह्यात जाण्याची बार्शीच्या लोकांना कसलीही हौस नाही. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपले वजन पडत नाही म्हणून ‘उस्मानाबादकडे चला’ असा सोपल आणि राऊत या परस्पर विरोधी नेत्यांचा डाव असल्याचे हि राजकीय जाणकारांचे मत आहे. तर राजकीय दृष्ट्या दोन्ही पक्षांना या भूमिकेची मोठी किंमत मोजावी लागेल असे सामान्य लोक बोलत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. तसेच नूतन महाराष्ट्र केसरी  बाला रफीक शेख याच्या विजया बद्दल आणि बार्शीची क्रिकेटपटू नेहा विजय चव्हाण हिची महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघात सतरा वर्षाखालील गटात समावेश झाल्या बद्दल या दोघांच्या हि अभिनंदनाचा प्रस्ताव बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.