काॅंग्रेस पक्षातील ‘या’ नगरसेविकेच्या जीवाला धोका ; ठार मारण्याचा कट

सोलापूर : पोलीसनामा – पक्षांतर्गत राजकारणातून सोलापूरमध्ये भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावरील विषप्रयोगाचे प्रकरण सध्या गाजत असतानाच काँग्रेसमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पक्षातीलच काही जणांकडून आपल्याला संपवण्याचा कट रचला जात असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाकडे व काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे. या तक्रारी अर्जाच्या प्रती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांनाही देण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सात वर्षापासून प्रभागात यशदा युवती महिला फौंडेशनच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करीत आहे. याकामी भाऊजी शौकत पठाण यांचे मोठे योगदान लाभत आहे. आपण केलेल्या विविध कामामुळे वाढते राजकीय अस्तित्व आणि समाजातून मिळणारा प्रतिसाद पाहता आपल्याच काँग्रेस पक्षातील काही लोक आपले शत्रू म्हणून पुढे आले आहेत. कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कट रचणारे यांनी काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे जाऊन हा कट रचला असून माझे भाऊजी पठाण यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे समजते. यातून वादावादीचे प्रकारही घडले आहेत. शिवाय या प्रकारामुळे पक्षाचीही मोठी बदनामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.