व्यवस्थापकानेच घातला वर्धा मुथुट फायनान्सवर दरोडा, आर्थिक अडचणीत आलेल्यांना घेतले होते हाताशी

वर्धा : वर्धा येथील मुथुट फायनान्सवर दरोडा दुसरा तिसरा कोणी नाही तर तेथील व्यवस्थापकानेच टाकल्याचे उघड झाले आहे. त्याच्यासह दरोडा टाकणार्‍या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महेश श्रीरंगे याच्यासह कुणाल धर्मपाल शेंदरे (वय ३६) , जीवन बबन गिरडकर (वय ३८, दोघे र. उज्वलनगर), मनीष श्रीरंग गोळवे (वय ३९, रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वर्धा येथील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी ९ वाजता दरोडा टाकून ९ किलो सोने लंपास केले होते. हा सर्व प्रकार पाहिल्यावर वर्धा पोलिसांना व्यवस्थापकावरच संशय आला होता. त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला. तेव्हा यातील चार संशयित हे यवतमाळलगतच्या करळगाव घाटात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळचा मुद्देमाल पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले. तब्बल नऊ किलो सोने या चौघांनी लुटले होते. काही तासातच वर्धा पोलिसांना मोठ्या घटनेचा उलगडा करण्यात यश आले.

आर्थिक परिस्थितीने त्रस्त असलेल्यांना एकत्र घेत महेश श्रीरंगे याने दरोट्याचा कट रचला. या अगोदर श्रीरंगे हा यवतमाळ येथे होता. श्रीराम फायनान्सह तेथील ग्राहकांची फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर यवतमाळमध्ये दाखल आहे. त्याने बनावट सोने तारण ठेवून ग्राहकांचे खरे सोने लंपास केल्याचा ठपका आहे. तो यवतमाळ सोडून वर्ध्यात स्थायिक झाला. यवतमाळमधील भूखंड घोटळ्यातील आरोपी मनी गोळवे याला सोबत घेतले. फार्मासिस्ट असलेला आगाशे याला सोबत घेतले. मोठी रक्कम हाती लागणार असल्याचे सांगून बेरोजगार असलेल्या इतर दोघांना त्यांनी कटात सामील करुन घेतले. मनीष गोळवे व त्याच्या तीन साथीदारांनी कार्यालयात दरोडा घातल्याचे दाखविण्यात आले. सुरुवातीला ३ किलो सोने चोरीला गेल्याचे रेकॉर्डवर दाखविण्यात आले. पोलिसांनी व्यवस्थापक महेश याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी थेट यवतमाळ गाठून चौघांना ताब्यात घेतले.