सांगली : स्थायी सभापतीसाठी निष्ठावंत नगरसेवक पांडुरंग कोरे यांना संधी, इतर इच्छुकांमध्ये नाराजी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली महापालिकेच्या स्थायी समिति सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपने अखेर निष्ठावंत नगरसेवक पांडुरंग कोरे यांना संधी दिली आहे. सोमवारी त्यांनी या पदासाठी अर्ज भरला. त्यानंतर आता भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पसरली आहे. इच्छुक भाजपच्या अनारकली कुरणे, सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं स्थायी समितीच्या निवडणुकीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या निवडणुकीसाठी आघाडीकडून काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळं नाराजांना सांभाळण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.त्याचबरोबर महापालिकेच्या महिला बालकल्याण, समाजकल्याण व चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपचे सात व काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सात अर्ज दाखल झाले आहेत. आज या सर्व पदांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड होणार आहे. भाजपकडून स्थायीसाठी कुरणे आणि मगदूम यांच्याबरोबरच कोरे देखील इच्छुक होते. या समितीमध्ये भाजपकडे काठावर बहुमत असल्यानं या नाराजांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीची जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक झाली. आमदार गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, सुरेश आवटी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सभापतीपदासाठी कोरे यांचे नाव निश्चत केले. त्यामुळं मगदूम आणि कुरणे नाराज झाले. दम्यान, या निवडणुकीसाठी भाजपने व्हिप जारी केला आहे. त्यामुळं नगरसेवक काय भूमिका घेतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.