21 सप्टेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार, या नियमांचे पालन करणे बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरु असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे, धार्मिक स्थळे आणि इतर महत्त्वाच्या संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहे. मात्र, यामध्ये शाळा सुरु होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत आहे. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याचे जाहीर केले आहे.

शाळा सुरु करण्यात येत असले तरी ऑनलाईन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या शाळा खुल्या करण्यास परवानगी आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

शाळेत कोणतीही ॲक्टिव्हिटी सुरु करण्यापूर्वी वर्ग, प्रयोगशाळा, सर्वजण वावरत असल्याचा परिसरात 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराइट सोल्यूशनने सॅनिटाइज करावे. सातत्याने स्पर्श होणाऱ्या भागामध्ये वारंवार सॅनिटायजेशन करणे आवश्यक आहे.

शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग (50 टक्क्यापर्यंत) यांना शाळांमध्ये ऑनलाइन टिचिंग किंवा टेली काऊन्सिलींग वा इतर कामांसाठी बोलवण्यात येईल.

प्रत्येक वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. तसेच दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूटांचे अंतर ठेवावे लागेल. त्यामुळे शाळांमध्ये बसण्याची रचना कोरोनाच्या नियमांनुसार करावी.