बहुचर्चित ‘ठाकरे’ चा दुसरा भाग येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा दुसरा भाग केला जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील वेगवान घडामोडी त्यामध्ये असतील अशी माहिती चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी येथे दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी अभिनेता नवाजुद्दिन सिध्दिकी, निर्माती पुर्वशी राऊत, निखिल साने उपस्थित होते.

” ‘ठाकरे’ हा जागतिक दर्जाचा सिनेमा आहे. देशावर प्रभाव असलेल्या नेत्याच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट 25 जानेवारीला
2500 स्क्रीनवर प्रदर्शित होईल. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत तो असुन देशाबाहेरील 500स्क्रिनवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या कालावधीत इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ नये असा प्रकार झाला नाही. चित्रपट कधी प्रदर्शित करायचा हा त्या निर्मात्याचा प्रश्न आहे. ” असे राऊत यांनी सांगितले.

या चित्रपटात ठाकरे यांचा पुर्ण जीवनपट मांडणे शक्य नव्हते. त्यांच्या जीवनावर दहा चित्रपट करता येईल. कथानकाच्या स्वरुपात ठाकरे यांची कारकीर्द कशी सुरू झाली हे या चित्रपटात असुन पुढील भागात ठाकरे यांच्या जीवनात 1993नंतर घडलेल्या वेगवान घडामोडी मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभिनेता नवाजुद्दिन सिध्दिकी याने ही भुमिका करण्यासाठी मला राऊत यांनी ऑफर दिली तेव्हा खरे वाटले नव्हते असे सांगत चित्रपट आणि ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मत मांडले. ” ठाकरे यांच्या मुलाखती, भाषणे मी इंटरनेटवर पाहिली, ऐकली. प्रेरणादायी असे ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व होते. व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते.त्यानंतर एक आणि बाहेर एक असे त्यांचे नव्हते. नागरिक त्यांच्यात भावनिकदृष्ट्या गुंतल्याचे आढळून आले. लोकांनी त्यांना नेता बनविलेले”असे सिध्दिकी ने नमूद केले.