मोदी सरकारच्या काळात 25 वरून 50 हजारावर पोहचला सेंसेक्स, जाणून घ्या यापूर्वी कसा होता वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर भारतीय शेयर बाजाराने गुरुवारी इतिहास रचला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेंसेक्सने(The Sensex ) पहिल्यांदा 50 हजाराचा आकडा पार केला आहे. सुमारे 41 वर्षापूर्वी 100 च्या आधार अंकावरून सुरू झालेला सेंसेक्स(The Sensex ) 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर 25 हजारापर्यंत पोहचला होता आणि याच सत्ताकाळाच्या सातवर्षांच्या आत 50 हजारापर्यंत पोहचला. सेंसेक्सचा हा प्रवास आणि त्याने कशाप्रकारे चढ-उतार पहिले ते पाहुयात.

देशात शेयर बाजार आणि त्याचा व्यवहार अनेक वर्षापासून सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (ज्यास आता बीएसई लिमिटेड म्हटले जाते) ची स्थापना 1875 मध्ये झाली होती. हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. परंतु, 30 शेयर्सच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेंसेक्सचे गठन 1 एप्रिल 1979 ला झाले, तेव्हा याचा निर्देशांक 100 मानला गेला आणि त्याचे बेस ईयर 1978-79 मानले गेले. सेंसेक्स प्रत्यक्षात सेंसेटिव्ह इंडेक्सचा शॉर्ट फॉर्म आहे. सेंसेक्समध्ये 30 दिग्गज आणि सर्वात सक्रिय व्यवहार असणार्‍या कंपन्याचे शेयर ठेवले जातात. यास भारतीय शेयर बाजाराचे हृदय मानले जाते.

1990 मध्ये 1000 च्या पुढे
1 एप्रिल आपल्या स्थापनेनंतर 3 एप्रिल 1979 ला सेंसेक्स 124.15 वर बंद झाला. यानंतर 2 जानेवारी 1981 ला सेंसेक्स 152.26 वर बंद झाला. 19 जुलै 1985 ला सेंसेक्स पहिल्यांदा 500 च्या स्तर पार करून 505.9 वर बंद झाला. 25 जुलै 1990 ला सेंसेक्स पहिल्यांदा 1 हजारच्या पुढे पोहचला आणि 1007.97 वर बंद झाला. यावर्षी चांगला मान्सून आणि कंपन्यांच्या चांगल्या परिणामामुळे सेंसेक्समध्ये मोठी उसळी आली.

मनमोहन यांचे उदारीकरण आणि सेंसेक्स 2000 च्या पुढे
याच्या पुढील अडीच वर्षातच सेंसेक्सने 2000 चा आकडा गाठला. 15 जानेवारी 1992 ला सेंसेक्स 2020.18 वर बंद झाला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी उदारीकरणाचे धोरण सुरू केले ज्यामुळे शेयर बाजार प्रचंड बहरला.

हर्षद मेहता कांडमुळे नुकसान
मार्च 1992 मध्ये सेंसेक्स पहिल्यांदा 4 हजाराच्या स्तरावर बंद झाला. परंतु, यानंतर सेंसेक्स 2900 वरून 4900 च्या दरम्यान हेलकावे घेत राहीला आणि त्यास 5 हजारपर्यंत पोहचण्यास सात वर्षापेक्षा जास्त काळ लागला. प्रत्यक्षात याच वर्षी हर्षद मेहताच्या घोटाळ्याचा खुलासा झाल्याने शेयर बाजार गडगडत होता आणि यामध्ये मोठी विक्री झाली.

भाजपा पहिल्यांदा सत्तेत, सेंसेक्स 5000 च्या पुढे
1999 मध्ये 13वी लोकसभा निवडणूक जिंकून भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा सत्तेत आली. या कारणामुळे शेयर बाजाराने 5,000 चा आकडा पार केला. 11 ऑक्टोबर 1999 ला सेंसेक्स 5031.78 वर बंद झाला.

अंबानी बंधुमधील तडजोडीचा परिणाम
20 जून 2005 ला ही बातमी आली की, मुकेश अंबानी आणि त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्यामध्ये तडजोड झाली आहे. या वृत्ताने गुंतवणुकदारांमध्ये सेंटिमेंट खुप मजबूत झाला आणि सेंसेक्स पहिल्यांदा 7,000 च्या पुढे पोहचला.

2006 मध्ये 10 हजारच्या पुढे
सेंसेक्सला 5 हजारावरून 10 हजारावर पोहचण्यास 6 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. 7 फेब्रुवारी 2006 ला सेंसेक्स 10082.28 वर बंद झाला. परंतु, पुढील दिड वर्षातच सेंसेक्स 10 वरून 15 हजारच्या स्तरावर पोहचला.

2007 साल चांगले ठरले
9 जुलै 2007 ला सेंसेक्स 15045.73 वर बंद झाला. हे साल सेंसेक्ससाठी चांगले ठरले. पुढील सहा महिन्यातच सेंसेक्स 20 हजारच्या स्तरावर पोहचला. डिसेंबर 2007 मध्ये सेंसेक्सने 20,000 चा स्तर पार केला.

2008 च्या मंदीने बिघडवला खेळ
8 जानेवारी 2008 ला सेंसेक्सने व्यवहाराच्या दरम्यान 21 हजारचा स्तर पहिल्यांदा पार केला होता, परंतु हा 21 हजारच्या खाली बंद झाला होता. परंतु याच वर्षी आलेल्या अंतरराष्ट्रीय मंदीने संपूर्ण खेळ बिघडवला. यानंतर सेंसेक्सला पुन्हा 21 हजारच्या स्तरावर जाण्यासाठी सुमारे 3 वर्ष लागली.

मंदीमुळे संपूर्ण जगातील शेयर बाजारांसह भारतीय शेयर बाजार सुद्धा डळमळीत झाला. 10 जानेवारी 2008 ला सेंसेक्स 14889.25 वर बंद झाले. याच वर्षी 16 जुलैला सेंसेक्स 12575.8 वर बंद झाला. इतकेच नव्हे, नोव्हेंबर 2008 मध्ये सेंसेक्स 8451.01 च्या स्तरापर्यंत पोहचला.

2009 मध्ये सुद्धा शेयर बाजाराची स्थिती खराब होती आणि मार्च 2009 मध्ये सेंसेक्स 8160.4 च्या स्तरावर बंद झाला. परंतु एप्रिल 2009 पासून शेयर बाजाराची स्थिती सुधारू लागली. जून 2009 मध्ये सेंसेक्स पुन्हा 15 हजारच्या स्तरापर्यंत पोहचला. यानंतर सप्टेंबर 2010 मध्ये सेंसेक्स पुन्हा 20 हजारच्या स्तरावर पोहचला.

3 जानेवारी 2011 ला सेंसेक्स 20,561.05 वर बंद झाला. मात्र, यानंतर या वर्षी शेयर बाजारात मोठी घसरण सुरू राहिली अणि याच वर्षी 5 ऑक्टोबरला सेंसेक्स घसरून 15792.41 च्या स्तरावर बंद झाला. यानंतर सेंसेक्सला पुन्हा 20 हजाराच्या स्तरावर येण्यास 2 वर्ष लागली.

2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या आगमनाचे बाजाराने केले स्वागत
2013 मध्ये बीएसई सेंसेक्सने पलटी मारली आणि 18 जानेवारी 2013 ला सेंसेक्स पुन्हा 20039.04 वर जाऊन बंद झाला. परंतु, यास 20 हून 25 हजारावर पोहचण्यास केवळ दिड वर्ष लागले. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाले. यामुळे शेयर बाजारात सुद्धा उत्साहाचे वातावरण तयार झाले. 16 मे 2014 ला सेंसेक्स 25,364 च्या स्तरापर्यंत पोहचला होता, मात्र तो बंद 25 हजारच्या खाली झाला. 5 जून 2014 ला सेंसेक्स 25019.51 वर बंद झाला. सेसेंक्सला 25 हजारहून 30 हजार पर्यंत पोहचण्यास तीन वर्ष आणखी लागली.

2017 मध्ये 30 हजारचा स्तर
2017 च्या एप्रिल महिन्यात सेंसेक्स 30133.35 पर्यंत पोहचला. पुढील एक वर्षातच सेंसेक्स 35 हजारच्या लेव्हलवर पोहचला. 17 जानेवारी 2018 ला सेंसेक्स 35081.82 वर बंद झाला. पुढील सुमारे 22 महिन्याला लागले पुन्हा सेंसेक्स ला 40 हजारच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी. 30 ऑक्टोबर 2019 ला सेंसेक्स 40051.87 च्या स्तरावर पोहचला.

कोरोना संकटात चढ-उतार
परंतु, यानंतर 2020 ला कोरोनाचा भयंकर काळ सुरू झाला. जानेवारी 2020 मध्ये 42 हजारच्या जवळ पोहचलेला सेंसेक्स मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनच्या नंतर धारातीर्थी होत मार्च 2020 मध्ये 25981.24 पर्यंत पोहचला. मात्र, एप्रिलचा शेवट आणि मेपासून पुन्हा सेंसेक्समध्ये तेजी येऊ लागली.

15 महिन्याच्या काळात 40 हून 50 हजार
30 ऑक्टोबर 2019 ला सेंसेक्स पहिल्यांदा 40 हजारच्या पुढे बंद झाला होता. परंतु, कोरोना संकटाच्या काळात मागच्या वर्षी लोकांकडे गुंतवणुकीची खुप कमी माध्यम राहिली होती आणि परदेशी गुंतवणुकदारांना सुद्धा भारतीय शेयर बाजारात पैसे लावणे आकर्षक वाटू लागले. तेव्हा परदेशी गुंतवणूक प्रवाह आणि स्थानिक गुंतवणुकदारांच्या बळावर सेंसेक्स सुमारे एक वर्षातच 40 वरून 45 हजारपर्यंत पोहचला. 4 डिसेंबर 2020 ला सेंसेक्स 45079.55 पर्यंत पोहचला. यानंतर सुमारे दिड महिन्यातच 21 जानेवारी 2021 ला सेंसेक्स 50 हजारच्या पुढे पोहचला.