‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल

आळंदी : पोलिसनामा ऑनलाईन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यात ‘श्रींचा’ पालखी रथ ओढण्यासाठी मानाची ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली असून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.

आळंदी येथील शेतकरी रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीस यंदाचा रथ ओढन्याचा मान मिळाला आहे. पायीवारी प्रस्थान सोहळ्याच्या पाश्‍वर्भूमीवर आळंदी मध्ये बैलजोडी निवड समितीची बैठक पार पडली. बैलजोडी निवड समितीने २०१८ च्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रामकृष्ण घुंडरे कुटुंबाच्या सर्जा -राजा या जोडीची निवड केली आहे. माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान परंपरागत कुर्‍हाडे, घुंडरे, वहिले, रानवडे, भोसले, वरखडे यांच्याकडे असतो. यंदा हा मान घुंडरे कुटुंबियांना मिळालेला आहे. घुंडरे यांनी वाई, बावधन या गावातून प्रत्येकी एक एक बैल घेत जोडी खरेदी केलीय. ही बैलजोडी पांढरीशुभ्र, वशिंड लक्षवेधी, शिंगाने अधिक भारदस्त आहेत. यावर्षी श्रींच्या सेवेची संधी मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे अशी भावना घुंडरे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

सोहळ्यापर्यंत कुटुंबियांकडून सर्जा-राजाची सेवा, त्यांचा खुराक, पशुवैद्यकीय तपासणी नियमित केली जाणार आहे. सर्जा-राजा शिवाय आणखी एक बैलजोडी पर्यायी व्यवस्था म्हणून व्यवस्थापनाने ठेवली आहे.