शिवसेना-भाजप युती होणार – आठवले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप यांच्यात युती होईल. तसेच भाजप-सेनेला रिपाइंच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या 40 ते 45 जागा निश्चित मिळतील, असा विश्वास केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी आज पिंपरी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस रिपाइंचे अविनाश म्हातेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अरिफ शेख, बाळासो भागवत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले की, रिपाइंचा भाजपला पाठिंबा आहे. भाजप-शिवसेनेची लोकसभेला युती झाल्यास रिपाइंला दोन जागा द्याव्यात, युती न झाल्यास मात्र चार जागांची मागणी करणार आहे. त्यात दक्षिण मुंबई, विर्दभातील रामटेक, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि उदयनराजे रिपाइंत आले तर सातारा अशा चार जागांवर आम्ही दावा केला आहे.

वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपला आतुन पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी उघड भाजपबरोबर यावे, मीही यापुर्वी काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रिडालोसचा प्रयोग केला आहे. त्यावेळी माझ्याही सभांना गर्दी व्हायची, लोक सभा ऐकून मतदान करीत नव्हती, तो प्रयोग आमचा फसला होता. आताही वंचित आघाडीचा उलट काॅंग्रेस-राष्ट्रवादीला तोटा होणार आहे. तर एमआयएम देखील भाजपलाच मदत करीत आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा आम्हाला विशेष काही फरक पडणार नाही, असे आठवले म्हणाले.