पुण्याच्या ‘बीव्हीजी इंडिया’कडं देखभालीसाठी असलेलं सोमनाथ मंदिर स्वच्छतेत देशात ‘नंबर वन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर हे देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या मंदिराला ‘सर्वात स्वच्छ मंदिर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील बीव्हीजी इंडिया या कंपनीकडे या मंदिराच्या देखभालीचे काम आहे. राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारांचे वितरण दिल्लीत होणार आहे.

गुजरातमधील सर्व तीर्थस्थळांच्या स्वच्छतेची मोहीम राज्य सरकारने २०१७ मध्ये हाती घेतली होती. त्यात सोमनाथ, गिरनार, द्वारका, अंबाजी, पलितना, पावागड, श्यामलजी आदींचा समावेश आहे. यातील सोमनाथ, द्वारका या तीर्थस्थळांचे काम बीव्हीजी इंडियाकडे सुपूर्द करण्यात आले. तेथील उत्तम काम पाहून स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसराच्या देखभालीचे कामही सरकारने याच कंपनीला दिले आहे.

मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी टिव्‌टर संदेशाद्वारे सोमनाथ मंदिराच्या पुरस्काराबाबत माहिती देताना म्हटले आहे की, जलशक्ती आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या या पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करून सोमनाथ देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे.

दरम्यान, ‘बीव्हीजी इंडियाने स्वच्छतेच्या बाबतीत देशात निर्माण केलेल्या अत्युच्च मापदंडांवर या पुरस्काराने मोहर उमटवली आहे’, अशी प्रतिक्रिया कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.