पाळीव कुत्रीमुळे वाचले मालकाचे प्राण

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाइन

उन्हाळी सुट्टीमुळे बहीण आणि तिचे नातेवाईक घरी मुक्कामी ठेवल्याच्या रागातून शिक्षक असलेल्या भावाने आपल्या सैनिक असलेल्या भावावर गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सैनिक असलेल्या भावाने पाळलेल्या एका इंग्लीश कुत्री मध्ये आल्याने त्यांचा जिव वाचला. परंतु यामध्ये कुत्री जखमी झाली आहे. ही घटना पातर्डी तालुक्यातील निवडुंगे वस्ती येथे सोमवारी (दि.१४) पहाटे दीडच्या सुमारस घडली. याप्रकरणी शिक्षक भावावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी माजी सैनिक बाळासाहेब मरकड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी उद्धव कोंडीराम मरकड याचेवर गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब मरकड हे पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे वस्तीवर राहतात. तर त्यांच्या शेजारी आरोपी उद्धव मरकड यांचे घर आहे. बाळासाहेब यांची मुलगी सुट्टीनिमित्त शेवगाव येथून आली असून तिच्या सोबत तिचे काही नातेवाईक देखील आले आहेत. तसेच नऊ तारखेला लग्न असल्याने त्यांची बहीण देखील निवडुंगे येथे मुक्कामी आली आहे. तू बहिणीला आणि तिच्या नातेवाईकांना मुक्कामी का ठेऊन घेतले, या कारणावरुन शिक्षक असलेल्या उद्धव याने बाळासाहेब यांच्यावर गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. उद्धव याने ज्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडली त्या रिव्हॉल्व्हरचा परवाना पुतणी पुष्पा निलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार, ता.राहुरी) यांच्या नावावर आहे. माहेरी आलेल्या पुष्पा यांनी त्यांचे रिव्हॉल्व्हर उद्धवकडे दिले होते.

सोमवारी (दि.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घरातील कुत्री भुंकू लागली. त्यावेळी बाळासाहेब यांनी बाहेर येऊन पाहिले असता समोर उद्धव हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभा होता. काही समजण्याच्या आत त्याने एक गोळी झाडली. त्यादरम्यान कुत्री आडवी आल्याने गोळी लागून कुत्री जखमी झाली. याप्रकरणी बाळासाहेब मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी उद्धव मरकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे पुढील तपास करीत आहेत.