‘मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत, रुग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकारच जबाबदार’, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे त्यांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. यावरुन सत्ताधाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना लाड म्हणाले, आज सर्वप्रथम या प्रकरणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केल्याचे समोर आले आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भीती एवढी निर्माण झाली आहे की, राष्ट्रीय पातळीवर देखील यांना दखल घ्यावी लागत आहे. हे प्रियंका गांधी यांच्या ट्विट वरुन स्पष्ट झालं आहे.

ते कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत

प्रसाद लाड म्हणाले, माझा मुख्यमंत्र्यांवर स्पष्ट आरोप आहे की ते कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. हा कट्टीचा डाव देवेंद्र फडणवीसांबरोबर आहे. ज्यावेळी विरोधी पक्षनेता माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडतात. तेव्हा सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी होती. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही फोन फडणवीस किंवा दरेकर यांना केला नाही. रुग्णांच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप लाड यांनी केला.

हा साठा राज्य सरकारलाच देणार होतो

या प्रकरणा संदर्भात माहिती देताना प्रसाद लाड म्हणाले, आम्ही सात ते आठ दिवसांपूर्वी रेमडेसिवीरसाठी दमणला गेलो होतो. त्यावेळी ब्रुक फार्मा कंपनीत गेलो. त्यावेळी आमच्यासोबत काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. त्या कंपनीत कामाचे सर्व शुटींग आम्ही केले आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांनी आम्हाला रेमडेसिवीर देण्याचे मान्य केले. यानंतर दरेकर यांनी राजेंद्र शिंगणे यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

50 हजार रेमडेसिवीर आम्ही भाजपच्या वतीने महाष्ट्राला देऊ इच्छितो, मात्र ते आम्ही एफडीए किंवा राज्य सरकारला देणार आहोत. तसेच सीताराम कुंटे यांना देखील कल्पना दिली होती. हा साठी आम्ही राज्य सरकारडे देणार असल्याचे सांगून परवानगी मागीतली होती. यानंतर चार दिवसांनी राज्य सरकारने 11 कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास परवानगी दिली. यामध्ये ब्रुक फार्मा कंपनीचे देखील नाव होते. त्यामुळे राज्य सरकार जो आरोप करत आहे, ब्रुक फार्मा ही कंपनी भाजपची आहे किंवा भाजपच्या लोकांची आहे, भाजपच्या लोकांनी साठा करुन ठेवला आहे, हे चुकीचे असल्याचे लाड यांनी सांगितले.

जनतेचा विचार केला असता तर…

ब्रुक फार्मा ही कंपनी 100 टक्के निर्यात करणारी कंपनी आहे. मात्र या कंपनीने महाराष्ट्राला दिवसाला 15 हजार रेमडेसिवीर देण्याचे मान्य केले. अशा परिस्थितीमध्ये जर राज्य सरकारला रेमडेसिवीर मिळत असेल, तर मला असं वाटतं की यामध्ये कुणाचे श्रेय आहे किंवा नाही यापेक्षा राज्य सरकारने मान्य केले असते, तर आज अनेक लोकांचे प्राण वाचले असते, राज्यात रेमडेसिवीर नसल्याने अनेकांचे प्राण जात आहेत. कदाचित ते वाचले असते आणि राज्याला चांगल्या औषधाचा पुरवठा देखील झाला असता, असे लाड यांनी बोलून दाखवले.

फडणवीसांना रेमडेसिवीर देण्याचा प्रश्न येतोच कुठे ?

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असता ब्रुक फार्मा कंपनीचे मालक महाराष्ट्राला इंजेक्शन देण्यास तयार झाले. त्यांच्या सोबत चर्चा करायची नाही, राजेंद्र शिंगणे यांचा ओएस दरेकरांच्या पीएला फोन करुन धमकी देतात आणि कंपनी मालकाला म्हणतात तुम्ही फडणवीसांना रेमडेसिवीर देत आहेत व आम्हाला देत नाही असं कसं चालेल ? पण मुळात फडणवीस यांना रेमडेसिवीर देण्याचा प्रश्न येतोच कुठे ? येणारा साठा हा महापालिका, राज्य सरकार, एफडीएच्या माध्यमातून वितरीत केला जाणार होता. मात्र, सत्ताधारी नेत्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आहेत, की रेमडेसिवीर भाजप कशी काय आणू शकते. तर यावर हे सांगावसं वाटतं की भाजप आणत नाही ते आणण्याची व्यवस्था करत आहे.

दहशतवाद्याप्रमाणे कंपनी मालकाला पकडले

प्रसाद लाड पुढे म्हणाले, बांद्रा येथील एफडीएच्या कार्यालयात मी गेलो होते.तिकडे मला महारष्ट्र सरकारचे पत्र मिळालं ज्या पत्राच्या माध्यमातून ब्रुक्स फार्माला एफडीए महाराष्ट्राने पत्र दिलेले आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारला व खासगी एजन्ट्सला देखील रेमडेसिवीर विकू शकता. असे असताना राज्य सरकार रात्रीच्या रात्री पोलिसांना माहिती मिळाली असल्याचे सांगून कंपनी मालकाला एका दहशतवाद्यासारखे पडून आणते. हजारो कोटींची उलाढाल करणारा माणूस महाराष्ट्राला मदत करायला तयार असताना त्याला आरोपीसारखे पडून आणून नको ते प्रश्न विचारले जातात, असे लाड यांनी सांगितले.