कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमणार : राज्य शासन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शिल्पा रणजित माजगावकर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पगारी पुजारी नेमण्याची भरती प्रक्रिया मंगळवार पासून प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहे.

करवीर निवासींनी श्री अंबाबाई देवीला मागील वर्षी पूजक अजित ठाणेकर यांनी घागरा चोळी नेसवली होती. या विरोधात कोल्हापुरात मोठं आंदोलन सुरू झालं. आणि मंदिरातील पुजारी हटाव अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूर ,शिर्डी मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील पगारी पुजारी या पदासाठी आज पर्यंत 113 अर्ज आले असून या मध्ये 6 महिला पुजाऱ्यांचे अर्ज आहेत. तर मंदिरातील कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे. या निवड प्रक्रियेत सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरी सध्या मंदिरात असणाऱ्या एकाही पुजाऱ्याने अर्ज केला नाही. 100 वर्षा पूर्वी मंदिरांमध्ये सर्व जातींचे पुजारी असावे आणि या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदीक स्कुलची स्थापना केली होती. आज 100 वर्षा नंतर मंदिरात सर्व जाती चे पुजारी नेमले जात असल्याने कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पगारी पुजारी नेमाणुकीसाठी सात सदस्यांची कमिटी करण्यात आली आहे. हे सदस्य या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.