पाणी गळती रोखण्यासाठी आता महापालिका घेणार यंत्राचा आधार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात सध्या कमी पाण्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागत असल्यामुळे पाण्याबाबत सध्या नागरिकांमध्ये नाराजीच आहे. पुण्याच्या पाणीप्रश्नासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांना देखील नागरिकांनी अनेकदा धारेवर धरले आहे. आता चोवीस तास समान पाणी योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात अत्याधुनिक मशीन दाखल झाल्या असून गळती शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या अत्याधुनिक यंत्रांबाबत माहिती देताना महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरात सध्या सुमारे पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती होत असून लवकरच ही गळती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून १५  ते २० टक्के कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या अत्याधुनिक यंत्राद्वारे सध्या निलायम चित्रपट गृहाजवळील भागात पाणी गळती तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी सिंहगड  रोडवर  मोठ्या प्रमाणात पाणीगळती झाली होती. त्यामुळे  हजारो लिटर पाणी वाया गेले होते. याबरोबरच शहरातील काही ठिकाणी सतत पाणी गळतीच्या समस्या वारंवार उद्भवतात. आता या यंत्राच्या मदतीने तरी पाणी गळतीची समस्या कमी होईल अशी आशा करूया.